(लांजा / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ आज सकाळी मासळीची वाहतूक करणारा ट्रक उलटून अपघात झाला. वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. यामध्ये ट्रकचालक सुदीप दुबे (वय २५) किरकोळ जखमी झाला असून, ट्रकमधील मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथून मासळी भरून गोव्याच्या दिशेने निघालेला ट्रक (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ४६८६) आज (सोमवारी) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अंजणारी पुलाजवळ पोहोचताच ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गावरच उलटला.
या अपघातात सुदीप दुबे हा चालक किरकोळ जखमी झाला. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील असून सध्या दापोली येथे राहतो. अपघातामुळे ट्रकमधील मासळी रस्त्यावर विखुरली गेली. त्यामुळे मासळीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


