( संगमेश्वर/प्रतिनिधी )
कडवई येथे आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई यांच्या वतीने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ, मृदुंग आणि विठुनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.
शाळेच्या पटांगणातून सुरू झालेली दिंडी पुरोहितवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराकडे मार्गस्थ झाली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांचा पारंपरिक वेश परिधान केला होता. “ज्ञानोबा माऊली, तुकाराम!” च्या जयघोषात आणि भजनांच्या सुरात मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीचे स्थानिक नागरिकांनी जागोजागी औक्षण करून स्वागत केले.
कडवई बाजारपेठेत दिंडी पोहचल्यावर रिंगण करून अभंगाच्या तालावर फेऱ्या घेण्यात आल्या. यानंतर दिंडीतील विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्थांकडून आणि नागरिकांकडून अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. रिक्षा संघटनेच्या वतीने केळी वाटप, ज्येष्ठ व्यापारी बापू खातू यांच्याकडून आईस्क्रीम, तात्या खातू यांच्याकडून चॉकलेट, अर्चना रुपेश रहाटे यांच्याकडून शेंगदाणा लाडू, रमाकांत पुरोहित (मंदिर व्यवस्थापक) यांच्याकडून राजगिरा, माजी सरपंच वसंत उजगावकर यांच्याकडून पुन्हा एकदा केळी वाटप करण्यात आले. मंदिरात पोहोचल्यानंतर दिंडीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मंदिराची प्रदक्षिणा घालत अभंगगायन केले. विद्यार्थिनींनी फुगड्यांचा आनंद लुटत वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.
या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे आणि पर्यवेक्षक संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. उपसरपंच दत्ताराम ओकटे, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, पालक प्रतिनिधी संजय उजगावकर आदी मान्यवरांसह कडवईतील व्यापारी, पालक व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृतिक विभागप्रमुख शशिकांत किंजळकर, निलेश कुंभार, प्रदीप कानाल, मिलिंद कडवईकर, आशिष सरमोकादम, समीर भालेकर, सोमनाथ कोष्टी, नयना गुजर, शुभम शिंदे, संजय घोसाळकर, राजेश खेडेकर आणि अरविंद सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.