(ठाणे)
उल्हासनगर शेजारील वरप गावातील विश्वजीत प्रिअर्स सोसायटीत राहणाऱ्या संतोष पोहळ याने चरित्राच्या संशयातून पत्नीची गुरुवारी रात्री उशिरा गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर चाकूने स्वतःवर वार करीत संतोषने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पतीवर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून गंभीर जखमी झालेल्या संतोषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारित्र्याच्या संशयातून संतोषने राहत्या घरातच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात मृत महिलेचे नाव विद्या संतोष पोहळ (वय ४०) असे असून, गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या पतीचे नाव संतोष पोहळ (वय ४१) असे आहे. संतोष याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पोहळ हे पत्नी आणि दोन मुलांसह कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावातील विश्वजीत प्रिअर्स या प्रतिष्ठित सोसायटीत राहत होते. संतोष हे व्यावसायिकरित्या चालक (ड्रायव्हर) म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी विद्या ही टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करत होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतोष यांनी संतापाच्या भरात धारदार चाकूने पत्नीवर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच म्हारळ पोलीस चौकीचे अधिकारी दत्तात्रय नलावडे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. तपासात ही घटना वैवाहिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
गंभीर जखमी अवस्थेत संतोष व विद्या या दोघांनाही उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विद्याचा मृत्यू झाला, तर संतोषची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर शांत मानल्या जाणाऱ्या विश्वजीत प्रिअर्ससारख्या उच्चभ्रू सोसायटीत मोठी खळबळ उडाली आहे. रहिवाशांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

