(मुंबई)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांच्या पार्श्वभूमीवर आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपये दिले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतही शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जात असून, प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा केले जातात.
राज्यात सध्या सुमारे 91 लाख 97 हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पुढील हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे सुमारे 1,930 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधीला अंतिम मंजुरी मिळताच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

