(जालना)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. “माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून रचण्यात आला,” असा दावा जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या प्रकरणी जालना पोलिसांनी गेवराई तालुक्यातील दोन जणांना अटक केली असून, त्यामध्ये धानोरा येथील अमोल खुणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जरांगेंनी धनंजय मुंडे आणि आरोपींच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिपदेखील माध्यामांसमोर ऐकवली आहे. त्यांनी धनंजय मुंडे आणि एका आरोपीच्या फोनवरील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप दाखवली. यामध्ये आरोपी धनंजय मुंडे यांच्याकडे गाडी मागताना दिसत आहे. तर ही गाडी आपल्या ताफ्यात टाकून आपल्या जीवावर घालण्याचा बेत होता, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पतीला दारू पाजून कट रचायला लावला — पत्नीचा आरोप
अमोल खुणे यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला. “माझ्या नवऱ्याला महिनाभरापासून दारू पाजून जरांगे यांच्या विरोधात षडयंत्र रचायला लावले गेले. माझे पती मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक असून, त्यांच्या मोबाईलवर आणि स्टेटसवर नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते त्यांना देव मानतात. तरीदेखील माझ्या पतीला या प्रकरणात अडकवले जात आहे,” असा दावा त्यांनी केला.
अमोल खुणे यांच्या आईनेही मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला. “माझ्या मुलाचा या कटाशी काहीही संबंध नाही. त्याला फसवले जात आहे,” असे सांगताना ती अश्रू अनावर झाली. खुणे कुटुंबीयांनी पोलिसांकडे सखोल चौकशी आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
जरांगे यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही पोलिस तपास सुरू असून, अटक केलेल्या दोन्ही संशयितांची गुन्ह्यातील भूमिका आणि मागचा सूत्रधार कोण? याचा तपास सुरू आहे.

