( मुंबई )
शहरातील कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसन व फुफ्फुसांच्या आजारांना सामोरे जावे लागत असून, काही गंभीर प्रकरणांत मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने तातडीने मोहीम राबवून सर्व कबुतरखाने बंद करावेत, तसेच कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करावी, असे स्पष्ट निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
मुंबईत सध्या एकूण ५१ कबुतरखाने असून, त्यापैकी काही शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे आहेत. यातील काही कबुतरखाने बंद अवस्थेत असले तरी अनेक अद्याप सुरू असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरत आहेत. दादरमधील कबुतरखाना पुरातन वास्तू म्हणून जतन करण्यात आला असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तोही हानीकारक ठरत असल्याचे मंत्री सामंत यांनी मान्य केले.
विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेच्या (ठाकरे गट) आमदार मनीषा कायंदे यांनी दादरसह मुंबईतील कबुतरखाने त्वरित बंद करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, महापालिकेने महिन्याभरात ही कारवाई करावी.
दरम्यान, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या मामीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. यासंदर्भात के-पश्चिम विभागातील एका कबुतरखाना बंद करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. दादरमधील कबुतरखान्याविरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिकेने तो दोन वर्षे बंद ठेवला होता, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
सरकारने या भागातील इमारतींच्या रहिवाशांची समिती नेमून, जे कोणी कबुतरांना खाणे टाकतील त्यांची नोंद ठेवण्याचे व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.