( नवी दिल्ली )
प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) च्या 22 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील 30,18,361 शेतकऱ्यांची बँक खाती 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत आधारशी लिंक केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा होणार नाही.
मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यावश्यक आहे. आधार लिंक नसल्यास थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत अडथळा येतो आणि हप्ता रोखला जातो. यासंदर्भात सरकारने राज्यवार यादीही जाहीर केली असून त्यातून चिंताजनक आकडे समोर आले आहेत.
या यादीनुसार, सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशातील असून सुमारे 10 लाख शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप आधारशी लिंक केलेली नाहीत. महाराष्ट्रातही ही संख्या मोठी असून 1,72,348 शेतकऱ्यांनी अद्याप आधार सीडिंग पूर्ण केलेली नाही. परिणामी, या शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
शेतकरी आपले बँक खाते आधारशी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी लिंक करू शकतात. ऑनलाइन पद्धतीत संबंधित बँकेच्या नेटबँकिंग वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर लॉग इन करून ‘Aadhaar Seeding’ किंवा ‘Aadhaar Update’ हा पर्याय निवडता येतो. काही बँका थेट UIDAI पोर्टलमार्फतही ही सुविधा देतात. ऑफलाइन पद्धतीत शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड आणि खाते तपशील सादर करावे लागतात. त्यानंतर आधार लिंकिंगचा फॉर्म भरून दिल्यास प्रक्रिया पूर्ण केली जाते. काही बँकांमध्ये एसएमएस किंवा एटीएमद्वारेही आधार लिंक करण्याची सोय उपलब्ध आहे.
आधार लिंक करणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे बंधनकारक नसले, तरी पीएम किसानसारख्या सरकारी योजनांचे अनुदान थेट खात्यात मिळवण्यासाठी ते आवश्यक आहे. आधार लिंक झाल्यानंतर बँकेकडून एसएमएस किंवा ईमेलद्वारे पुष्टीकरण दिले जाते.
पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा पुढील हप्त्याचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते.

