(मंडणगड)
आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवासी ट्रॅव्हलर बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून, घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव साहिल विजय बेंद्रे (वय २३) असे असून तो लांजा तालुक्यातील खोचरे येथील मूळ रहिवासी होता. सध्या तो घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास होता. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी साहिल आपल्या आठ मित्रांसमवेत दुचाकीवरून दापोली तालुक्यातील पांगारी गावाकडे निघाला होता. मात्र प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाप्रळ बौद्धवाडी परिसरात महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर डायव्हर्शन देत एकेरी वाहतूक सुरू आहे. सकाळी सुमारे आठच्या सुमारास साहिल दुचाकीने पुढे जात असताना समोरून मुंबईच्या दिशेने येणारी प्रवासी ट्रॅव्हलर बस अतिवेगाने व बेदरकारपणे धावत येऊन दुचाकीला समोरून धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की साहिल बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी दूर फेकला जाऊन जखमी झाला. जखमीला तत्काळ ग्रामीण रुग्णालय भिंगळोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलिस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन व चालक पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

