(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-मार्लेश्वर मार्गावर निवेखुर्द येथे आज (शनिवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वळणावर डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने चालक बचावला असला, तरी तो डंपरच्या केबिनमध्ये अडकून पडला. या मार्गावर वारंवार होणारे डंपरचे अपघात आणि चालकांकडून केली जाणारी बेदरकार होणारी वाहतूक यामुळे स्थानिक वाहनचालकांसह मार्लेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
सध्या देवरूख-मार्लेश्वर मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामासाठी लागणारी खडी डंपरमधून वाहून नेली जात आहे. मात्र, हे डंपर बेदरकारपणे चालवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डंपरच्या बेजबाबदार वाहनचालनेला आळा कधी बसणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन डंपरचालकांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी होत आहे.
डंपरचालकांच्या बेदरकार वाहनचालनेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच त्यांच्यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकाराला आळा न घातल्यास देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील रुंदीकरणाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.


