(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२०-२१’ जिल्हास्तरीय पुरस्कार रत्नागिरीतील समाजसेविका श्रीमती अश्विनी पवनकुमार मोरे यांना जाहीर झाला आहे. महिला व बालकल्याण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन आणि परिणामकारक कार्याची दखल घेत शासनाने हा सन्मान दिला आहे. या यशामुळे सामाजिक क्षेत्रासह विविध स्तरांवरून अश्विनीताईंच्या कार्याचे कौतुक होत आहे.
अश्विनीताईंच्या समाजसेवेची पायाभरणी लहानपणापासूनच झाली. पहिली-दुसरीच्या वर्गात असतानाच त्या गावोगावच्या जत्रा-मेल्यांत गाणी गाऊन व नाचून संस्थेच्या ‘भाकर’च्या कार्यासाठी निधी उभारण्यास हातभार लावत असत. या संस्थेच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या जेवणाचा खर्च भागवला जात असे. पुढे त्या संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभागी होत गेल्या. आई स्व. अरुणा पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त करताना केलेल्या समाजसेवेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत अश्विनीताईंनी तोच वारसा पुढे नेण्याचा ध्यास घेतला. ‘भाकर’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी तब्बल १५ पदयात्रा, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, माता-बाल संगोपन, गुजरात भूकंप व दुष्काळातील चारा छावणी, कोविड-१९ काळातील मदतकार्य, चिपळूण पुरातील मदतकार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले. आतापर्यंत ३५ हून अधिक महिला मेळावे आयोजित करून ग्रामीण महिलांमध्ये जागृती निर्माण केली.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उत्तम यश संपादन केले असून, मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणीत पदवी तसेच समाजसेवा (MSW) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे तीन वर्षं म्हाडा झोपडपट्टी विकास कार्यक्रमात कार्य करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. बाहेर अधिक पगाराच्या संधी असूनही आजही त्या अल्प मानधनावर समाजसेवा करत आहेत, हीच त्यांच्या सेवाभावाची प्रचीती आहे. सन २०१२ मध्ये त्यांनी आई-वडिलांनी स्थापन केलेल्या ‘भाकर’ संस्थेचे काम नव्या जोमाने हाती घेतले. कोकणातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्याचे ध्येय बाळगून त्यांनी समुपदेशक, केंद्रप्रशासक आणि केंद्रसमन्वयक म्हणून कार्य करत आजवर ८०० हून अधिक पीडित महिलांना नवे आयुष्य दिले आहे.
सध्या त्या विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, सखी वन-स्टॉप सेंटर, रत्नागिरीच्या केंद्रप्रशासक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्यसनमुक्ती समिती सदस्य, तसेच विविध सरकारी व खाजगी संस्थांच्या POSH समित्या सदस्य म्हणून त्यांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या ३२ वर्षांपासून ‘भाकर’ संस्था कोकणात सातत्याने कार्यरत असून, स्वच्छ भारत मिशन, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण प्रकल्प, पाणलोट विकास, हस्तकला प्रशिक्षण, सखी सेंटर, वृद्धाश्रम ‘आजी-आजोबांचे गाव’, महिला पुनरुत्थान केंद्र अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य राबवत आहे. संस्थेच्या सचिव या नात्याने अश्विनीताई यांचे नेतृत्व संस्थेला नवी दिशा देत आहे.
भविष्यात समाजशास्त्र महाविद्यालय, रात्रमहाविद्यालय तसेच आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्याच्या तयारीत त्या आहेत. श्रीमती अश्विनी मोरे यांच्या या कार्याला मिळालेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ हा त्यांच्या सामाजिक योगदानाला मिळालेला योग्य सन्मान असून, कोकणातील समाजसेवेच्या इतिहासात तो प्रेरणादायी अध्याय ठरेल, अशी सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

