( साखरपा / भरत माने )
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती (ग्रामीण) ची नवी कार्यकारिणी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत बहुमताने जाहीर करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी साखरपाचे अनुभवी क्रिकेटपटू मारुती वाघमोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अमित जाधव, अभिराज नारकर व सूर्यकांत पांचाळ, सचिवपदी रणजित पवार, सहसचिवपदी मयुरेश यादव, स्वप्निल माईन व अमित तळेकर, खजिनदारपदी रोहित जाधव यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून शशिकांत गोरुले, आदित्य केळस्कर, योगेश चव्हाण, अनिकेत शिंदे व रितेश पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत आगामी स्पर्धांसाठी संघ नोंदणी शुल्क ₹१००० निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व संघांनी १० मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच विभागनिहाय कार्यकारिणी व जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नगरपंचायत क्षेत्रातील संघांना वॉर्डनिहाय स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच मुंबईस्थित क्रिकेटपटूंनी स्वागत केले असून, या समितीच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मारुती वाघमोरे म्हणाले, “तालुक्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ हा आमच्या क्रिकेट परिवाराचा भाग आहे. संगमेश्वर तालुक्याच्या क्रिकेटला नवी दिशा आणि नवे यश मिळवून देण्यासाठी संपूर्ण कार्यकारिणी एकजुटीने काम करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

