( मुंबई )
राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र या हप्त्याच्या वितरणास झालेल्या विलंबामुळे आणि सध्या राज्यात लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही, असा प्रश्न लाभार्थी महिलांसमोर निर्माण झाला आहे.
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने २८८ निमशहरांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात कोणताही शासकीय निधी किंवा नवीन आर्थिक लाभ दिला जात नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सध्या थांबवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्र दिल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने पुढील हप्ता थांबवण्यात आला होता. त्यामुळे या वेळेसदेखील तत्सम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती होती. आता राज्यातील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा झाल्याचे समजते. मात्र आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अनिश्चितता आहे.

