(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवरुखच्या राजकीय पटलावर हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अनेक पक्षांतील महिलांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिक काळात झालेल्या राजकीय उलथापालथींमुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
देवरुख नगरपंचायतीची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर २०१३ मध्ये पहिली निवडणूक झाली होती. त्या वेळी भाजप-शिवसेना युतीने सत्तेवर कब्जा केला होता. या काळात नीलम हेगशेट्ये आणि स्वाती राजवाडे यांनी अनुक्रमे नगराध्यक्षपद भूषवले. पुढे युतीत फूट पडताच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेची सूत्रे हाती घेतली आणि नीलेश भुरवणे नगराध्यक्ष झाले. यानंतर झालेल्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने थेट नगराध्यक्षपदी झेंडा फडकवला. मृणाल शेट्ये यांनी जनतेच्या थेट निवडणुकीत विजयी होत पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्या काळात नगरपंचायतीत भाजपचे सात, शिवसेनेचे चार, राष्ट्रवादीचे चार, मनसेचा एक व एक अपक्ष नगरसेवक असे बलाबल होते.
२०२३ नंतर प्रशासकाच्या अखत्यारीत गेलेल्या नगरपंचायतीत आता पुन्हा एकदा लोकशाहीची लढत रंगणार आहे. या वेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असल्याने देवरुखमध्ये पुन्हा एकदा ‘महिलाराज’ येणार हे निश्चित झाले आहे. याआधीचे ओबीसी महिला आरक्षण रद्द झाल्याने काही इच्छुकांच्या राजकीय आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळीवर उमेदवारांच्या चर्चांना जोर आला असून, अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच दोन्ही गटांतील गोटेबांधणी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरील इच्छुकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे देवरुखची निवडणूक दुरंगी, तिरंगी की चौरंगी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकीय समीकरणांतील बदल, आरक्षणातील फेरफार आणि नव्या नेतृत्वाच्या आकांक्षा या तिन्ही घटकांमुळे देवरुख नगरपंचायतीची निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे.

