(साखरपा / भरत माने)
नवी मुंबई, नेरुळ सेक्टर १५ येथील ईच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी भक्तिभावात साजरी करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर सद्गुरू दिगंबर स्वामी यांचे दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक ३ जुलै ते ९ जुलै या कालावधीत सामुदायिक गुरुचरित्र पारायण करण्यात आले. यामध्ये देशभरातून आलेले २०० हून अधिक अनुयायी सहभागी झाले होते. मंदिरात दरवर्षी ३६५ दिवस अखंड गुरुचरित्र पारायण व हरिपाठाची परंपरा संस्थेच्या वतीने जपली जाते. उत्सवाची सुरुवात पहाटे ४ वाजता सद्गुरूंच्या अभ्यंगस्नानाने झाली. त्यानंतर नियमित अभिषेक, आरती व पादुकाभिषेक मोठ्या भक्तिभावात पार पडले. गायत्री महायज्ञ घालून भक्तांसाठी समाधान, शांती आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला भव्य दिंडी सोहळा दुपारी पार पडला. जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो भाविकांनी या पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला. यानंतर पारंपरिक नामदान समारंभ व नामयज्ञ संपन्न झाले. दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ, सत्संग, महाआरती यांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी संध्याकाळीही महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंच्या प्रेरणेतून आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीतून हे उपक्रम राबवण्यात आले असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सद्गुरू दिगंबर स्वामी यांनी भक्तांच्या अध्यात्मिक उन्नतीसोबतच सामाजिक परिवर्तनाचीही दिशा दिली आहे. दारूमुक्ती, नशामुक्ती व समाजातील विस्कळीत संसार पुन्हा एकत्र आणणे यासारख्या कार्यात त्यांनी अनेकांचे जीवन सकारात्मक वळणावर आणले आहे. “या स्थळी केवळ अध्यात्मिक शांतीच नव्हे, तर आंतरिक समाधानही लाभते,” असे त्यांनी सत्संगातून सांगितले.
सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, भक्तमंडळी, अन्नदाते व देणगीदार यांचे सहकार्य लाभले. दिगंबर स्वामी यांनी सर्वांचे आभार मानत, “वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात, भाविकांनी त्यात सहभागी व्हावे आणि आत्मिक समाधानाचा अनुभव घ्यावा,” असे आवाहन केले. या दिवशी महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांची त्रिवेणी लाभलेला हा उत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

