(संगमेश्वर / एजाज पटेल)
दिवाळी सणाच्या आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसीची अट डोकेदुखी ठरत आहे. शासनाने योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने लाभार्थी महिलांच्या ओवाळणीच्या आनंदात अडथळा निर्माण झाला आहे.
दिवाळीच्या उत्सवात लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवसांना विशेष महत्त्व असते. भावंडांच्या नात्याचा गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेच्या मुहूर्तावर महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा भावनिक आणि आर्थिक आधार मिळणार होता. मात्र, ई-केवायसीच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे खाते अद्याप सक्रिय झालेले नाही.
विवाहित महिलांना पतीचा आधार कार्ड क्रमांक लिंक करावा लागतो, तर अविवाहित मुलींना वडिलांचे आधार लिंक करून ई-केवायसी करावी लागते. या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि प्रणालीतील त्रुटी यामुळे केवायसी पूर्ण होत नाही.
लाखो महिलांना याचा फटका
संगमेश्वर तालुक्यासह कोकणातील अनेक भागांत महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत. शासनाने केवायसीसाठी मुदतवाढ दिली असली, तरी दोन महिन्यांपासून अनुदान रखडलेले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार की नाही, याबाबत महिलांमध्ये अस्पष्टता आणि नाराजीचे वातावरण आहे.
‘नेटचा अडसर’ ठरतोय सणातील अडथळा
ई-केवायसीसाठी लागणारा सर्व्हर आणि कनेक्टिव्हिटीचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याने अनेक लाभार्थी बहिणी “लाडकी योजना की लाडकी अडचण?” असा प्रश्न विचारत आहेत. यामुळे दिवाळीच्या उजेडात तांत्रिक अंधाराची छाया पडल्याचे चित्र तालुकाभर दिसून येत आहे.

