(चिपळूण / प्रतिनिधी)
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि सूचनांचा बारकाईने विचार करून तब्बल १,३०१ मतदारांची नावे पुन्हा त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत.
शहरातील १४ प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करण्यात आली आहे. प्रारंभी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत ४२,८५१ मतदारांची नोंद होती. या याद्यांवरील चुका, नावे बदलणे किंवा चुकीच्या प्रभागात गेलेल्या नावांसंदर्भात १५१ नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. या सर्व हरकतींवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रांत कार्यालयात सुनावणी घेतली. नागरिक आणि प्रशासन दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर १,४२९ नावांपैकी १,३०१ नावे मतदारांच्या मागणीनुसार योग्य प्रभागात पुनर्स्थापित करण्यात आली, तर १२८ नावे अमान्य ठरवण्यात आली.
मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे आणि प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक रोहित खाडे आणि निवडणूक विभागप्रमुख सागर शेडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून अंतिम यादी सादर केली आहे. ही अंतिम मतदार यादी नगरपरिषद कार्यालयात, नोटीस बोर्डवर तसेच संकेतस्थळावर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणातही चैतन्य निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार आता आपल्या प्रचारयोजनेच्या आखणीसाठी सज्ज होत आहेत.

