(चिपळूण)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत चिपळूण तालुक्यातील अनारी गावात सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आलेला महावृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई, पुणे, अनारी), केदारनाथ ग्रामसुधार समिती आणि अनारी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रविवार, २८ जून २०२६ रोजी ग्रामदेवता मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांसह मुंबई आणि पुणे येथून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवत सर्वांनी वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग घेतला.
या महावृक्षारोपण मोहिमेत आंबा, काजू यांसारख्या फळझाडांबरोबरच देशी, औषधी आणि शोभिवंत वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. ग्रामदेवतेच्या मंदिर परिसरातील सुमारे १८ एकर जागेवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण केले जात असून, यंदाचा उपक्रमही तितक्याच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी नागरिक तसेच अनारी गावातील विविध संस्था आणि मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमासाठी अनेक संस्था, संघटना आणि दात्यांनी वृक्षरोपे, कलमे, तण नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य तसेच आर्थिक मदत देऊन मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
छायाचित्र : अनारी येथे आयोजित महावृक्षारोपण मोहिमेत चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले आणि ग्रामस्थ वृक्षलागवड करताना.

