(रत्नागिरी)
“कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ (Vigilance Awareness Week 2025) निमित्त २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी जनतेत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अभियानाचा एक भाग म्हणून १ ऑक्टोबर रोजी पोलीस उपअधीक्षक श्री. पाटील यांनी आकाशवाणी केंद्र 101.5 एफ.एम. वाहिनीवरील NEWSONAIR या लाइव्ह मोबाइल अॅपद्वारे “भ्रष्टाचार निर्मूलन” या विषयावर मार्गदर्शनपर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ व संपर्क क्रमांक ०२३५२-२२२८९३ बाबत सविस्तर माहिती दिली आणि कोणतीही लाच मागणी झाल्यास त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले.
या अभियानाअंतर्गत अधिकारी आणि कर्मचार्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानक, रत्नागिरी बस स्थानक आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे भेट देऊन नागरिक, रेल्वे पोलीस व पोलीस पाटील यांना भ्रष्टाचारविरोधी कायदे व तक्रार प्रक्रियेची माहिती दिली. या ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली तसेच हँडबिल्सचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी केंद्र तसेच सोशल मीडियाद्वारे — विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमातून — भ्रष्टाचाराविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने शासकीय कामासाठी लाच मागितल्यास, नागरिकांनी खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा :
पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील – 📱 7588941247
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव – 📱 9870474535
पोलीस निरीक्षक सुहास रोकडे – 📱 9067035910
तसेच नागरिक acbmaharashtra.net या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. विभागाचा टोल फ्री क्रमांक – 1064, दूरध्वनी क्रमांक – 02352-222893, तसेच ई-मेल आयडी: acbratnagiri@gmail.com / dyspacbratnagiri@mahapolice.gov.in उपलब्ध आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचाराविरोधात सजग रहा, लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार करून प्रशासनास पारदर्शकतेसाठी हातभार लावा.

