(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा बौद्धवाडीत बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थ तसेच शेतकरी भयभीत झाले आहेत. येथील शेतकरी ऋषभ जाधव यांनी चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्यांची शिकार करण्यासाठी एका बकरीवर हल्ला केला. यावेळी मुक्या जनावरांवर जीवापार प्रेम करणाऱ्या ऋषभ याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबटयाच्या तावडीतून जखमी अवस्थेत बकरीची सुटका केली या खरी, परंतु बिबट्याने त्यानंतर दुसऱ्या बकरीवर झडप मारून ऋषभच्या डोळ्यादेखत बकरीला पळवले. तर पुन्हा लागोपाठ दोन दिवस रात्रीच्या वेळी गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे गरीब शेतकरी असलेल्या ऋषभवर मोठे संकट ओढवले आहे.
ऋषभ जाधव हा गरीब शेतकरी असुन नोकरी व्यवसाय नसल्याने शेळ्या पालन करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. मात्र गेले वर्षभर या भागात बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे. ऋषभने मोठ्या मेहनतीने पाळलेल्या शेळ्यांचा कधी रानात चरत असताना तर कधी गोठ्यात शिरकाव करून बिबट्या शेळ्या फस्त करत आहे. गेले वर्षभरात दहा शेळ्या व चार पिल्लांची शिकार बिबट्याने केली असून बिबटयाच्या तावडीतून जखमी अवस्थेत सहा ते सात शेळ्या सुटल्या आहेत. त्यातील दोन शेळ्या उपचार करूनही वाचवता आल्या नाहीत.
गेले वर्षभर वावर असलेल्या बिबट्याचे परिसरात अनेकांना दर्शन झाले आहे. मोठ्या मेहनतीने व जीवापार प्रेम करून पाळलेल्या बकऱ्यांवर बिबट्या ताव मारत असल्याने व रक्ताला चटावलेला बिबट्या पाठ सोडत नसल्याने या गरीब शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून गेले वर्षभर वन विभाग कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन तसेच वर्षभरात ज्या-ज्या वेळी बकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या त्या-त्या वेळी त्यांना माहिती देऊनसुद्धा या गंभीर विषयाची कोणतीच दखल घेतली नाही. तर चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची सुद्धा माहिती देण्यात आली. परंतु येतो म्हणून सांगितले, मात्र साधी विचारपूस करण्यासाठी सुद्धा वन विभाग कर्मचारी फिरकत नसल्याचे ऋषभ जाधव याने सांगितले.
मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची दहशत आता अधिक गडद झाली असून दिवसाढवळ्या ही बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ सैरवैर भटकंती करताना दिसू लागल्याने शेतात जाणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विध्यार्थ्यां समोर मोठे संकट उभे राहले असून, वनविभागाने यापुढे झाले तेवढे बास, बिबटयाच्या हल्ल्यात न भरून येणारी हानी होण्याची प्रतीक्षा न करता व कागदी घोड्यांची वाट न पाहता बिबट्याला जेरबंद करण्याची तसदी घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

