( शिर्डी )
१९७७ मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साईं बाबा’ या मालिकेत सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारली होती. आणि ती सिरियल मोठ्या प्रसिद्धी जोत्यात आली. त्या काळात दळवी यांना देखील खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अनेकजण त्यांनाच खरे साईबाबा समजू लागले होते. सध्या ते ८६ वर्षांचे आहेत.
साईबाबांची महती जगभर पोहोचवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि साईबाबांचे परमभक्त सुधीर दळवी सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने दळवी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे त्यांनी चाहत्यांना मदतीचे आवाहन केले असून, या आवाहनाला साईनगरी शिर्डीकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिर्डी ग्रामस्थांनी एकत्र येत पाच लाख रुपयांची मदत गोळा केली आहे. याशिवाय साईबाबा संस्थानचे कर्मचारी आपल्या अर्धा दिवसाचा पगार दळवी यांच्या उपचारासाठी देणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले की, “अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. श्रीरामनवमी उत्सवात जमा झालेल्या लोकवर्गणीतील साडेचार लाख रुपये आणि अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळून पाच लाखांची मदत ग्रामस्थांनी देऊ केली आहे. साई संस्थानचे कर्मचारीही अर्धा दिवसाचा पगार देणार आहेत.”
सुधीर दळवी यांनी १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारत जगभर साईबाबांच्या भक्तीचा संदेश पोहोचवला होता. त्यांच्या अभिनयामुळे शिर्डीचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलं. आता त्यांच्या उपचारासाठी शिर्डीकरांनी दाखवलेली एकजूट ही साईभक्तीच्या परंपरेचा खरा प्रत्यय आहे. ग्रामस्थ आणि साईभक्तांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली.
दरम्यान, सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेतली असून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

