(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख येथील सरस्वती ॲकॅडमी तर्फे प्रभाकर सनगरे यांच्या पुढाकाराने स्थानिक चित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र (भाऊ) शिंदे, कुमार भाट्ये आणि दिक्षा सागवेकर यांच्या कलाकृतींनी रसिकांची मनं जिंकली.
या प्रदर्शनाला भेट देताना आमदार किरण (भैया) सामंत यांनी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, “या प्रतिभावान कलाकारांची चित्रे जिल्हा मुख्यालयातील तारांगण येथे मोफत प्रदर्शनात मांडून ही कला सर्वदूर पोहोचवू,” अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडीक, माजी नगरसेवक वैभव पवार, बाबू मोरे, बापू शिंदे, विलास मोरे आणि रोहन हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र महाडीक यांनी कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, तर रोहन बने यांनी “देवरुखमधील कलाकारांसाठी लागेल ती मदत आपण करू; त्यांच्या कलाप्रेमाचा सन्मान झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
या प्रदर्शनाला जिल्हाभरातील कलारसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी चित्रे विकत घेऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. कलाकारांनी मान्यवरांच्या भेटीबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

