(मुंबई)
नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळांसाठी दिलेल्या पुस्तकांची परस्पर विक्री करून एका खाजगी कंपनीची ३४ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या शाळेच्या प्राचार्यासह कंपनीच्या दोन सेल्समनविरुद्ध एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र साळवे, चित्रा घस्टे आणि संतोष हनुमंत जगताप अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, चेतना एज्युकेशनची यात फसवणूक झाली असून कंपनीतर्फे सायली मोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची कंपनी ही शालेय शिक्षणासाठी लागणारी पुस्तके तयार करून संपूर्ण भारतात पुरवठा करते. कंपनीने जिल्हा निहाय सेल्समनची नेमणूक केली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी कंपनीने जितेंद्र साळवे याची जुलै २०२१ पासून नियुक्ती केली होती. साळवे हा नाशिकमधील शाळा आणि पुस्तक विक्रेत्याकडे कंपनीच्या पुस्तकांची जाहिरात करून ऑर्डर घेत होता. नाशिकच्या जेएमसीटीच्या शाळेच्या नावाने कंपनीकडून मागविण्यात आलेल्या पुस्तकांची जून २०२१ पासून थकबाकी होती. याबाबत कंपनीने साळवेला विचारणा केली असता शाळा लवकरच पैसे देईल असे त्याने सांगितले. अखेर, कंपनीने शाळेकडे चौकशी केली. त्यावर, शाळेने घेतलेल्या पुस्तकांची रक्कम ही साळवेला दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र साळवेने पुस्तके शाळेच्या नावावर कंपनीकडून मागवली होती.
काही पुस्तक ही शाळेने स्विकारली आणि उर्वरीत पुस्तक त्याने शाळेच्या प्राचार्य चित्रा घस्टे यांच्याशी संगमत करत खुल्या बाजारात विक्री केल्याचे सांगितले. तसेच, जेएमसिटी शाळेला साहित्य पुरविताना साहित्यांच्या बिलाची रक्कम धनादेशाद्वारे किवा ऑनलाईन कंपनीला न देता घस्टे यांनी सेल्समन साळवेला रोख स्वरुपात रक्कम दिल्याचे उघड झाले. याबाबत दैनंदिन रजिस्टरमध्ये कच्ची नोंद घेवून साळवेच्या सह्या घेतल्याचे उघड झाले. साळवे याने अशाप्रकारे २६ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी सेल्समन म्हणून नेमणूक केलेल्या सेल्समन संतोष जगताप याने रत्नागिरीतील १७ ठिकाणचे पैसे अशाचप्रकारे परस्पर हडपल्याचे समोर आले आहे. जगताप याने कंपनीची ८ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अखेर कंपनीने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एकूण ३४ लाख ५८ हजारांच्या फसवणूकीची तक्रार दिली आहे. दरम्यान, चेतना एज्युकेशन कंपनीने केलेल्या आरोपात तथ्य नसून त्याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याबाबत माहिती नसल्याचे जेएमसिटीच्या प्राचार्या चित्रा घस्टे यांनी सांगितले.