(पुणे)
पुणे शहरातील एका नामांकित शाळेत अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेला मोबाईलवर ‘आय लव्ह यू’सह अश्लील मेसेज पाठवले, तसेच प्रेमास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी वारंवार शिक्षिकेला हार्ट इमोजी, प्रेम व्यक्त करणारे संदेश पाठवत होती. “तुम्ही मला खूप आवडता”, “तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही”, “तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही” अशा प्रकारचे मेसेज पाठवून तिने शिक्षिकेवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.
शिक्षिकेने विद्यार्थिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समोर आले. या विद्यार्थिनीने आपल्या हातावर ब्लेडच्या सहाय्याने शिक्षिकेचे नाव कोरले आणि त्याचे फोटो त्या शिक्षिकेला पाठवले. तसेच, प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकीही दिल्याची माहिती आहे.
या प्रकारानंतर शिक्षिकेने तात्काळ शाळा प्रशासनाला संपूर्ण घटना सांगितली. शाळा प्रशासनाने चौकशी सुरू केली असता आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या. संबंधित विद्यार्थिनीने यापूर्वी इतर मुलींनाही ‘आय लव्ह यू’चे मेसेज पाठवले होते. काही दिवसांपूर्वी तिने एका विद्यार्थिनीला वॉशरूममध्ये अडवून “तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफ्रेंड आहे का?” असे प्रश्न विचारल्याचाही प्रकार समोर आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने सावध भूमिका घेतली. सर्वप्रथम विद्यार्थिनीच्या पालकांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर समुपदेशकांच्या माध्यमातून तिचे समुपदेशन करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, तारुण्यावस्थेतील भावनिक बदल, आकर्षण, हार्मोनल बदल आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी.
तज्ज्ञांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये अशा प्रकारचे भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतात. अशा वेळी पालकांनी राग न व्यक्त करता मुलांकडे लक्ष देणे, संवाद साधणे आणि गरज असल्यास समुपदेशनाची मदत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

