(संगमेश्वर / एजाज पटेल)
दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथील मकरंद कृष्णा पाल्ये या ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मकरंद कृष्णा पाल्ये (वय ३२ वर्षे, रा. वांद्री कुणबीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मकरंद पाल्ये याला दारू पिण्याचे व्यसन होते, तसेच त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असल्याने तो अपंग होता. या अपंगत्वामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते, या मुळे तो नैराश्यग्रस्त होता. या नैराश्यातूनच मकरंद याने २५ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान वांद्री कुणबीवाडी येथील त्याच्या राहत्या घराच्या खोलीतील पंख्याच्या वर असलेल्या लोखंडी चॅनलला नायलॉनची रस्सी बांधून गळफास लावून घेतली.
घडलेल्या घटनेची खबर मयत तरुणाचे शेजारी राहणारे अवधूत सुभाष सालीम यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेच्या स्थळी जाऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून मकरंद याने जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त व्यक्त केली जात असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

