(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. महसूल व वन विभागाने भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, नाशिक आणि कोकण विभागातील १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित लेखी परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व विभागांची परीक्षा एकाच दिवशी घेणे आणि वयोमर्यादेतील सवलतीबाबत तांत्रिक अभिप्राय प्राप्त करणे, या कारणांमुळे हा बदल करण्यात आला आहे. राज्यातील २९१२ हून अधिक रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया नव्या वेळापत्रकानुसार पूर्ण केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील अंतिम नियुक्तीपत्रांचे वितरण २६ जानेवारी २०२७ रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, १७ जानेवारीला लेखी परीक्षा, १८ जानेवारीला उत्तरसूची आणि निकालाची घोषणा, तर १८ ते २५ जानेवारीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. पात्र उमेदवारांना प्रजासत्ताक दिनी नियुक्तीपत्रे मिळण्याचा मार्ग या सुधारित वेळापत्रकामुळे निश्चित झाला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ३१ ऑगस्ट २०२६ अखेर रिक्त असलेली २९१२ हून अधिक महसूल सेवकांची पदे भरण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली होती. यापूर्वीच्या नियोजनानुसार २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या चार महसुली विभागांतील भरती प्रक्रिया यापूर्वीच स्थगित करण्यात आली होती.
दरम्यान, नाशिक आणि कोकण विभागातील भरती प्रक्रिया सुरू होती. या दोन्ही विभागांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन सेवेतील गट-अ ते गट-ड संवर्गातील भरतीसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. ही सवलत महसूल सेवक पदभरतीसाठी लागू होणार आहे की नाही, याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.
वयोमर्यादेच्या सवलतीबाबतची तांत्रिक बाब प्रलंबित असतानाच राज्यातील सर्व विभागांची परीक्षा एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने नाशिक आणि कोकण विभागातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर यांनी १२ नोव्हेंबर रोजी पत्र काढून हा निर्णय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, २३ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकानिहाय रिक्त पदांची यादी तयार केली जाणार आहे. १ ते १५ डिसेंबरदरम्यान बिंदुनामावली तयार करण्यात येईल, तर १५ डिसेंबर रोजी भरती समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१ ते ७ जानेवारी २०२७ दरम्यान प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. ८ ते १५ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील. त्यानंतर १७ जानेवारी रोजी लेखी परीक्षा होईल. १८ जानेवारीला उत्तरसूची आणि निकाल जाहीर करण्यात येणार असून, १८ ते २५ जानेवारीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली जाईल. अखेर २६ जानेवारी २०२७ रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
नाशिक आणि कोकण विभागातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सर्व उमेदवारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच महसूल सेवक पदभरतीसाठी वयोमर्यादेतील शिथिलता लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय कळविण्यात येईल, असेही शासनाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


