(मुंबई)
लालबागमधील काळाचौकी येथे शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रेमवीर तरुण सोनू बराई याने प्रेमिका मनीषा यादववर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करून आत्महत्या केली. प्राथमिक उपचारांसाठी मनीषा यादवला रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू बराई आणि मनीषा यादव या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आठ दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता, त्यातून ब्रेकअप झाले होते. मात्र ब्रेकअप झाल्यानंतरही आरोपी त्या तरुणीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी सकाळी तरुणी नेहमीच्या रस्त्यावरून जात असताना सोनूने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मनीषाने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला, त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वेळी रागात सोनूने मनीषावर प्राणघातक हल्ला केला.
मनीषाने आपल्या बचावासाठी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली. त्यानंतर आरोपीही तिच्या मागे पळला आणि नर्सिंग होममध्ये सर्वांसमोर त्याने तिच्यावर खोलवर वार केले. त्यानंतर तेथेच सोनूने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केली. ही घटना इतक्या क्षणात घडली की उपस्थित लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही.
सुरुवातीला मनीषाला भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले गेले, नंतर तिला पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी ३.४५ वाजता तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु संध्याकाळी ५.३० वाजता मनीषा यादवचा अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेला वैयक्तिक वादातून घडलेली घटना असल्याचे सांगितले असून, सध्या या प्रकरणी सविस्तर तपास सुरू आहे.

