(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील उद्यमनगर येथील छाया मारुती गुरव (वय ५४) यांचे रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच निधन झाले. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छाया गुरव यांना गेल्या सात महिन्यांपासून कर्करोगाचा त्रास होता. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर गुरव त्यांना पाणी देण्यासाठी गेला असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले.
त्यानंतर सागर गुरव यांनी खासगी रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रात्री १०.५२ वाजता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.


