(संगमेश्वर / एजाज पटेल)
‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया… अशा गीतांच्या तालावर गुरुवारी संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात भाऊबीज सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. बहिणींनी आपल्या लाडक्या भावांसाठी विविध मिष्ठान्नांनी मनोभावे जेवण केले, त्यांचे औक्षण करून दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळी कालावधीतील शेवटचा आणि महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. या सणामुळे भाऊ-बहीण नाते अधिक घट्ट होते. संगमेश्वर, देवरुख, फुणगूस, कोंडये, खाडी परिसरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये भाऊबीजेचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. स्थानिक तसेच ऑनलाईन बाजारपेठेत या निमित्ताने ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. ज्वेलरी दुकाने, कपडे, मोबाईल्स, शोभेच्या वस्तू आणि भांडी विक्रीसाठी महिलांची विशेष गर्दी होती.
या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याचे कल्याण व्हावे, त्याचे आयुष्य दीर्घ व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करते. भावानेही ओवाळणी घेत बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या घरी भोजन करणे, ही या दिवसाची जुनी परंपरा आहे. सख्खी बहीण नसल्यास अन्य नात्यातील बहिणीकडे जाऊन ओवाळून घेण्याची प्रथा आहे, यामुळे नात्यातील प्रेम व कृतज्ञता अधिक दृढ होते.
भाऊबीजचे महत्त्व आणि पौराणिक कथा
भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. भाऊबीजेला अनेक कारणांनी धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेला होता अशी अख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे देखील सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हटले जाते.
या पौराणिक परंपरेला जपत आजही बहिणी भावाच्या आयुष्यभराच्या सुखासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. आधुनिक युगातही ही परंपरा तितक्याच उत्साहाने आणि आपुलकीने जपली जात आहे. भाऊबीज हा सण केवळ नात्यांचा नव्हे, तर भावनिक बंधांचा उत्सव आहे — प्रेम, कृतज्ञता आणि एकतेचा संदेश देणारा.

