(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील मजगाव येथील श्री. अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या आंबा कलम बागेतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने थरारक बचाव मोहिम राबवून सुखरूप बाहेर काढले. ही घटना गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
सकाळी सुमारे 9.30 वाजता मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. तत्काळ ही माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री. प्रकाश सुतार यांच्याकडे पोहोचवण्यात आली. त्यानंतर रेस्क्यू पथक, पिंजरा व आवश्यक साहित्य घेऊन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहीर ही आंबा कलम बागेतील असून ती आयताकृती आकाराची, सुमारे 15 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 25 फूट खोल आहे. पाण्याची पातळी सुमारे 7 ते 8 फूट असल्याने बिबट्या विहिरीतील दगडावर पाण्यात बसलेला अवस्थेत दिसून आला. तात्काळ विहिरीभोवती सुरक्षा जाळे टाकून परिसर बंदिस्त करण्यात आला. त्यानंतर दोऱ्यांच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि अवघ्या 15 मिनिटांत बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.
यानंतर पशुधन विकास अधिकारी मालगुंड येथील श्री. स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या पूर्णतः सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. सदर नर बिबट्याचे वय अंदाजे 6 ते 7 वर्षे असून, विहिरीवर शेडनेट असल्याने तो भक्षाचा पाठलाग करताना अपघाताने विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ही संपूर्ण बचाव कारवाई माननीय विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपाल श्री. न्हानू गावडे (पाली), श्री. सारीक फकीर (लांजा), श्रीमती विराज संसारे (रत्नागिरी), वनरक्षक शर्वरी कदम (जाकादेवी), प्राणीमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे यांच्यासह पोलीस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, दिवे, गावचे सरपंच फैय्याज मुकादम, तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
वन विभागाने या यशस्वी मोहिमेतील सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले असून बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास अथवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाचा टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा मो. 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

