(देवरूख)
देवरुख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.
ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा भारतीय विद्यापीठ संघ आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ललित कलांमध्ये दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सादर केलेली दर्जेदार रांगोळी कला यासाठी विलास रहाटे यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.
उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य नाईक (अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी होते. यावेळी प्रा. (डॉ.) अजय भामरे (प्र-कुलगुरू), श्री. गोविंद मुथूकुमार (महासचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन), डॉ. राजेश सोबती (निरीक्षक, भारतीय विद्यापीठ संघ), डॉ. मनोज रेड्डी (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग) आणि डॉ. प्रसाद कारंडे (कुलसचिव) यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात, विद्यानगरी, कलिना येथे आयोजित करण्यात आला होता. विलास रहाटे यांना विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व प्रोत्साहन लाभत आहे.
या सन्मानामुळे विलास विजय रहाटे यांच्या कलात्मक यशाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून देवरुखसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

