(पाली / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली क्र. १ येथे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि सर्जनशीलतेचा उत्तम संगम घडवून सुंदर शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती साकारली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा उद्देश केवळ बौद्धिक विकास नसून चारित्र्यनिर्मिती, सर्जनशीलता आणि एकविसाव्या शतकातील आवश्यक कौशल्यांचा विकास करणे हा आहे. याच हेतूने शाळेत “एक भारत, श्रेष्ठ भारत” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कलाकृती व हस्तकला कार्यशाळा घेण्यात आल्या.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आकाशकंदील तयार करणे, पणत्या रंगविणे, भेटकार्ड तयार करणे अशा उपक्रमांत उत्साहाने सहभाग नोंदविला.
मुख्याध्यापक श्री. जनार्दन मोहिते यांच्या संकल्पनेतून पदवीधर उपशिक्षिका सौ. ममता सावंत, श्री. मारुती घोरपडे, सौ. श्रद्धा रसाळ, सौ. श्रुती वारंग आणि सौ. प्रमिला मावळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमेश शिंदे यांनी किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी आवश्यक साहित्य आणि सहकार्य उपलब्ध करून दिले.

