(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देशातील निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार होत असल्याचा आरोप तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरीत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा’ या घोषवाक्यासह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, देशातील कथित ‘व्होट चोरी’च्या प्रकरणासह मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अन्य निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर परिणाम होत असल्याचा दावा करत काँग्रेसने तीव्र निषेध नोंदविला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा देईपर्यंत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही जिल्हा काँग्रेसने दिला आहे. देशभरातही काँग्रेससह विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत आक्षेप व्यक्त केले जात आहेत.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होईल. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांचा अधिकार आणि घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर आणि प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिपे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संविधानप्रेमी नागरिकांनी या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


