(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबटे संचार करीत असल्याचे समाजमाध्यमांवर धडकी भरवणारे वृत्त वेगाने पसरले आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, तपासात समोर आले की हे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले होते.
गेल्या दहा बारा दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर गांग्रई येथे चार बिबट्यांचा कळप दिसल्याचे दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात होते. प्रत्यक्षात, परिसरातील नागरिक आणि वन विभागाकडे बिबट्याचे कोणतेही खरे दर्शन नोंदलेले नाही.
तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असली तरी, काही दिवसांपूर्वी निर्वाळ येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली होती. याशिवाय, कळंबट येथे मृत अवस्थेत बिबट्या आढळला, शिरगाव तळसर परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळले आहे, तर इतर ठिकाणी विहिरीत किंवा फासकीत अडकलेले बिबटेही आढळतात. काही बिबटे गावांमध्ये कुत्री आणि गायींची शिकार करत मानववस्तीवर आपले अस्तित्व दाखवत आहेत.
गांग्रई गावच्या रस्त्यावर चार बिबट्यांचा कळप दिसल्याचा व्हिडिओ अफवा पसरवण्यासाठी बनवण्यात आला असल्याचे वन विभागाच्या तपासात समोर आले. परिक्षेत्र वन अधिकारी सर्वर खान यांनी ग्रामस्थांशी चौकशी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की व्हिडिओ फेक आहे.
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी. बिबट्याचा प्रत्यक्ष दर्शन झाल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, तसेच समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती खात्रीशीर नसल्यास शेअर करू नये.

