(चिपळूण)
अभिनयाची आवड असलेल्या तरुणांसाठी आणि इच्छुकांसाठी आता कोकणात सिनेसृष्टीकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर, कोकणात प्रथमच ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे, अशी माहिती परिषद अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली.
ही कार्यशाळा १ आणि २ नोव्हेंबर २०२५, दुपारी २ ते सायं. ८ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अभिनय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकांना कॅमेरा समोर आत्मविश्वासाने उभे राहण्याचे प्रशिक्षण देणे तसेच ऑडिशन प्रक्रियेची सखोल माहिती मिळवणे हे आहे.
कार्यशाळेत कॅमेरा फेसिंग तंत्रज्ञान, ऑडीशन मार्गदर्शन, अॅक्टींग इम्प्रोवायजेशन आणि भरपूर प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश असेल. सहभागी वयोमर्यादा १५ वर्षांपासून पुढे असून, फी ₹१००० आहे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रोहन मापुस्कर यांनी ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्य केले आहे. तसेच ‘एप्रिल-मे ९९’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केले असून, त्यात ‘झोंबिवली’, ‘स्माईल प्लीज’, ‘वाळवी’, ‘वेड’, ‘ठाकरे’, ‘सचिन’, ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘उनाड’, ‘व्हेंटिलेटर’, ‘हिरकणी’, ‘रूपनगर के चिते’ यांचा समावेश आहे.
त्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अभिनय शिकण्याची आणि सिनेसृष्टीच्या प्रत्यक्ष अनुभवाची संधी कोकणातील नवोदित कलावंतांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी योगेश बांडागळे (९९२३४२८८३८) आणि ॲड. विभावरी राजपूत (७७९६७२९५८७) यांच्याशी संपर्क साधता येईल.
कार्यशाळेबाबत माहिती देताना डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले, “या उपक्रमातून कोकणातील अभिनय क्षेत्रातील नवोदितांना योग्य दिशा मिळेल. सुप्त कलागुणांना वाव मिळून सिनेसृष्टीकडे पहिले पाऊल टाकण्यास मदत होईल.”

