(चिपळूण)
सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील या तरुणाने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर होण्याचा थरारक पराक्रम साधला आहे. या यशामुळे पृथ्वी पाटील हा संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे.
काय असतो सुपर रँडोनिअर किताब?
ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत भारतातील विविध क्लब्सकडून बीआरएम (Brevets de Randonneurs Mondiaux) या सायकल स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनुक्रमे 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर अंतर सायकलवर पूर्ण करायचे असते, त्यासाठी 13.5, 20, 27 आणि 40 तासांची वेळमर्यादा दिली जाते. या सर्व राईड्स पूर्णतः सेल्फ-सपोर्टेड असतात, म्हणजे रायडरला स्वतःच सर्व तयारी व व्यवस्थापन करावे लागते.
सामान्यतः जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत चारही बीआरएम पूर्ण करणाऱ्या रायडरला सुपर रँडोनिअर हा किताब दिला जातो. परंतु या वेळेस सह्याद्री रँडोनिअर्स यांनी आव्हानात्मकता वाढवून सलग पाच दिवसांत चारही बीआरएम आयोजित केल्या होत्या.
अशा कठीण स्पर्धेत केवळ शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक स्थैर्याचा जबरदस्त कस लागतो. पृथ्वीने पाच दिवसांत तब्बल १,५०० किमी अंतर पार करत हा विलक्षण पराक्रम केला आहे.
पृथ्वी पाटीलचे यश आणि सन्मान
पृथ्वी हा डॉ. कृष्णकांत पाटील व डॉ. सौ. दर्शना पाटील यांचा सुपुत्र असून चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य आहे. त्याच्या या यशानंतर चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. आपल्या अनुभवाबद्दल पृथ्वी म्हणाला “चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले.”
सह्याद्री रँडोनिअर्सने कराड–सोलापूर, कराड–नागज, कराड–बारामती–इंदापूर आणि कराड–फलटण या मार्गांवर बीआरएम आयोजित केल्या होत्या. संपूर्ण मालिकेदरम्यान सायकलपटूंच्या सुरक्षिततेसह आहार, तब्येत आणि मनोबल याकडे विशेष लक्ष देण्यात आले. पृथ्वीने सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा श्री. मनोज भाटवडेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या ऐतिहासिक यशानंतर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. शेखर निकम यांनी कराड येथे पृथ्वीचा विशेष सन्मान केला. या सन्मानाबद्दल पाटील कुटुंबीयांनी आमदार निकम, चिपळूण सायकलिंग क्लब तसेच सह्याद्री रँडोनिअर्सच्या पदाधिकाऱ्यांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

