(माथेरान)
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध माथेरान येथे पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकचा ५८ वर्षीय पर्यटक शानमुगा सुंदरम बाळसुब्रमण्य हे १५ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले होते. माथेरान पोलिसांच्या माहितीनुसार, ते ‘वरांडा इन फॉरेस्ट बार हाऊस’ या हॉटेलमध्ये राहात होते. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी सुमारे सात वाजता बाहेर जाताना ते दिसले, मात्र संध्याकाळपर्यंत परत न आल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले.
तत्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली आणि सामाजिक माध्यमांवर त्यांच्या शोधाची मोहीम सुरू करण्यात आली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर १८ ऑक्टोबर रोजी किंग जॉर्ज पॉईंटजवळील सुमारे १२०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला. सह्याद्री रेक्सु टीम आणि माथेरान पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.
पोलीसांनी मृतदेहाची ओळख पडताळणी केली असता, तो शानमुगा सुंदरम यांचाच असल्याचे निश्चित झाले. मृतदेह नातेवाइकांच्या हवाली सुपूर्त करण्यात आला. या घटनेने माथेरान परिसरात खळबळ उडाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीएसआय गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तपास सुरू असून, घटनेचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी विविध शक्यतांचा शोध घेतला जात आहे.

