(पुणे)
पुण्यातील शनिवारवाडा परिसरात काही महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील काही हिंदू संघटनांनी शनिवारवाड्यात निदर्शन केले. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाची संरक्षित वास्तू असल्याने अशा ऐतिहासिक ठिकाणी कोणताही धार्मिक विधी किंवा प्रार्थना करण्यास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे संघटनांनी संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
राजकीय वाद वाढला
व्हिडिओवरून महायुतीत कलह सुरु झाला. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आंदोलन केले. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत शनिवारवाड्यात आंदोलन केले. ठोंबरे-पाटील म्हणाल्या की, “कोणीही नमाज पठण केलं म्हणजे शनिवारवाडा त्या व्यक्तीच्या नावावर होत नाही. काहींनी या विषयाला वेगळ्या वळणावर नेऊन हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.”
शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंचा आरोप
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, “शनिवारवाडा ही संरक्षित वास्तू आहे आणि तिचे नियम पाळले पाहिजेत. प्रशासन अस्तित्वात असून कोणत्याही व्यक्तीने ‘आपण सरकार आहोत’ अशा थाटात वागू नये. तसेच महिलांनी नमाज पठण केले असेल, तर संयम बाळगला पाहिजे. उद्या कुणी मशिदीत कीर्तन करण्याची घोषणा केली, तरी नियमांचं पालन होणं महत्त्वाचं आहे.”
या प्रकरणामुळे पुण्यातील शनिवारवाडा परिसरात धार्मिक विधी, प्रशासनाचे नियम आणि राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

