(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकात वाहनचोरीच्या घटना घडवून पोलिसांना चकवणाऱ्या सराईत चोर अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा. भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. त्याच्याकडून तब्बल १० लाख २५ हजार रुपये किंमतीच्या १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. शेलारचा साथीदार विजय मधुकर गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक नेमून तपास सुरू केला.
दरम्यान, तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार अक्षय शेलार हा शाहू टोल नाका परिसरात असल्याचे समजले. उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा रचून शेलार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ताब्यात असलेली ‘बुलेट’ मोटरसायकल वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीची असल्याची कबुली दिली. अधिक तपासात शेलार याने साथीदार विजय गुरव यांच्या मदतीने पन्हाळा, पेठवडगाव, शाहुवाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, राजापूर (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), सांगली आणि निपाणी (कर्नाटक) या भागांमधून मोटरसायकली चोरल्याचे उघड केले. त्याच्या कबुलीजबाबावरून एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून, १५ मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
या मोटरसायकली म्हसोबा माळ, गोकुळ शिरगाव येथील कौतुक कुडेकर यांच्या घरासमोर गेटच्या आत लपवून ठेवल्या होत्या. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर आणि कोकण विभागात डोके वर काढलेल्या वाहनचोरीच्या मालिकेला आता आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

