(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना शहरांतील बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर फटाक्यांचे छोटे मोठे स्टॉल उभारले जात आहेत. या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून फटाक्यांमधील स्फोटक पदार्थांमुळे अपघात होण्याची तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सर्व फटाका विक्रेते, स्टॉलधारक तसेच नागरिकांना जबाबदारीने आणि कायद्याचे पालन करून सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस दलाने जारी केलेल्या सूचनांनुसार, फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून परवाना घेणे अनिवार्य आहे. परवान्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. परवान्याविना फटाक्यांचा स्टॉल उभारणे हा दंडनीय गुन्हा असून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 288 तसेच Explosive Substances Act, 1884 चे कलम 9(B)(1)(B) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, अधिकृत परवाना घेतलेल्या सर्व स्टॉलधारकांनी आपल्या परवान्याची प्रत त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. परवानाधारकांनी आपल्या स्टॉलवर आवश्यक त्या सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, आग प्रतिबंधक साधने ठेवावीत आणि स्फोटक पदार्थांपासून सुरक्षित अंतर राखून साठवणूक करावी, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सांगितले की, नागरिकांनी सण साजरा करताना कायद्याचे पालन आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघातांची शक्यता कमी होईल आणि सणाचा आनंद निर्भयतेने लुटता येईल. दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि ऐक्याचा सण असून तो उत्साहात पण जबाबदारीने साजरा करणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाने म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सणाच्या आनंदात सुरक्षिततेचे भान राखा आणि कायद्याचे पालन करून सुरक्षित व आनंदी दिवाळी साजरी करा.

