( मुंबई )
“स्वप्नांचं शहर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं हे आजही अनेकांसाठी केवळ स्वप्नच ठरत आहे. गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचा संघर्ष म्हातारपणापर्यंत सुरूच राहतो. या पार्श्वभूमीवर भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी NARDECO Maharashtra’s The Real Estate Forum 2025 चे आयोजन 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, पुढील दोन वर्षांत किमान दहा लाख लोकांना मुंबईत घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार ठोस प्रयत्न करत आहे.
सरनाईक म्हणाले, “सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरं देणं, हीच राज्य शासनाची भूमिका आहे. श्रीमंतांनाच घरं मिळावीत असं नाही. गोरगरीब जनतेला देखील स्वतःचं पक्कं घर हवं, हे शासन मान्य करतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.”
त्यांनी पुढे सांगितलं की, मुंबई व ठाणे सारख्या महानगरांतील झोपडपट्टीवासीयांना घरं मिळण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत. लोकांनी आयुष्यभर रस्त्यावर राहावं असं आम्हाला मान्य नाही. प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाबरोबरच विविध प्राधिकरणे आणि संस्थांच्या माध्यमातून मुंबईकरांना आणखी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, यासाठी सरकार काम करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी आणि घरांच्या परवडणाऱ्या प्रकल्पांवर भर देणारा हा फोरम उद्योगातील दिग्गजांसाठी तसेच सामान्य घरखरेदीदारांसाठी महत्त्वाचा मंच ठरला.

