(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात पोलीस कर्मचारी असलेल्या पतीसह तिघांविरुद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती निलेश भागवत (वय 37, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी आरती भागवत यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे लग्न 30 मे 2015 रोजी निलेश सुरेश भागवत (वय 42, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) याच्याशी झाले. निलेश हा पोलीस कर्मचारी असून सध्या त्याची नेमणूक जयगड सागरी पोलीस ठाण्यात आहे. मात्र, 2018 पासून त्याच्या वर्तनामध्ये बदल होऊ लागला. त्याचे महिलांसोबत सतत संपर्क ठेवणे व फोनवर वारंवार बोलणे यामुळे घरगुती वाद निर्माण होत होते. या विषयावर विचारणा केली असता तो आरती यांना वारंवार मारहाण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरती भागवत यांच्या तक्रारीनुसार, 15 सप्टेंबर 2025 रोजी निलेश भागवत यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि डोके भिंतीवर आपटून दुखापत केली. या दरम्यान आरती यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता नणंद दिक्षिता दिलीप यादव (रा. लांजा) आणि एक अल्पवयीन मुलगी यांनी देखील हाताच्या थपडा मारून मारहाण केल्याचे नमूद आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी निलेश सुरेश भागवत, दिक्षिता दिलीप यादव आणि अल्पवयीन मुलगी या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 117(1), 352, 351(2), 115(2), 85 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

