(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या औचित्याने सत्कोंडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जि.प. आदर्श शाळा सत्कोंडी व जि.प. शाळा पन्हळी या दोन्ही शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून वह्या-दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर “पोलीसकाका, पोलीसदिदी” ही नावीन्यपूर्ण संकल्पना सादर करत, शाळेचे वातावरण भीतीमुक्त, विश्वासार्ह आणि संवादशील कसे राहील, यावर त्यांनी मार्मिक मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक पाटील यांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला. त्यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनगटात राखी बांधून स्नेहबंधन जोडले, तसेच कवितांचे सुंदर सादरीकरण केले..या भेटीनंतर श्री. पाटील यांनी ग्रामपंचायत सत्कोंडीच्या कार्यालयालाही भेट देत, शालेय आणि सामाजिक सुरक्षेबाबत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोर्ये, ग्रामसेवक श्रीकांत कुळ्ये, मुख्याध्यापक सुभाष पालये, पो.ह. शिंदे, कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.