(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी अक्षरशः संताप उसळला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्यान्वये दुसरा गुन्हा नोंदवला गेल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आदित्य समीर बने (वय २५, रा. रत्नागिरी) याला अटक केली असून खेड न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी आदित्य हा शहरातील एका मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होता. पीडित मुलीच्या आईने याच कंपनीतून कर्ज घेतले होते. त्या माध्यमातून आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यान्वये तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, याच आठवड्यात बुधवारी शहरातील शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणीही ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. एकापाठोपाठ घडणाऱ्या या दोन गंभीर घटनांमुळे चिपळूण शहरात संतापाची लाट उसळली असून पालक वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून अशा घृणास्पद कृत्यांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

