(खेड / रत्नागिरी)
तीन लाख रुपये असल्याचे भासवून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल सराफाच्या हातावर टेकवायचे आणि त्या बदल्यात सोन्याचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशी शिताफीची फसवणूक खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे उघडकीस आली आहे. दोन भामट्यांनी भरदुपारी सराफाच्या दुकानातच हा डाव साधत दोन सोन्याच्या चेन लंपास केल्या. या व्यवहारात सराफ संतोष आदावडे यांची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाली. सोमवारी (९ नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आदावडे यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे घाणेखुंट बसथांब्याशेजारी ‘सोनल ज्वेलर्स’ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. दोन सोन्याच्या चेन खरेदी करायच्या असल्याचे सांगत त्यांनी दागिने पाहण्यास सुरुवात केली. आदावडे यांनी त्यांना विविध चेन दाखवल्या. त्यातील एक चेन मित्राला दाखवून येतो, असे सांगत एक तरुण दुकानाबाहेर गेला. काही वेळाने तो पुन्हा दुकानात परतला आणि त्याच्यासोबत आणखी एक तरुणही आला. दोघांनी दोन चेन खरेदी करण्याचे निश्चित केले. यानंतर संशयितांनी कॅरीबॅगमधून पाचशे रुपयांच्या सहा बंडलांचा गठ्ठा काढून काउंटरवर ठेवला. त्यामध्ये तीन लाख रुपये असल्याचे भासवत, ‘पैसे इथेच ठेवा, मी मित्राला चेन दाखवून येतो,’ असे सांगून त्यांनी सराफाचा विश्वास संपादन केला. व्यवहारावर विश्वास ठेवून आदावडे यांनी नोटांचे बंडल काउंटरवर ठेवले; मात्र संशयितांचा खरा डाव काही क्षणांतच उघड झाला.
दरम्यान, आदावडे यांचा भाचा दुकानाच्या दरवाजाजवळ उभा राहून संशयितांवर लक्ष ठेवून होता. मात्र, दोन्ही तरुण महामार्गावर उभी केलेल्या चारचाकी गाडीत बसले आणि मुंबईच्या दिशेने वेगाने पसार झाले. भाच्याने वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडीला नंबर प्लेटच नसल्याने तिचा क्रमांक टिपता आला नाही. काही वेळाने काउंटरवर ठेवलेल्या नोटा बनावट असल्याचे लक्षात येताच आदावडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी तत्काळ लोटे पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, ज्या सोनल ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला, त्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासासमोर अडचण उभी राहिली आहे. विशेष म्हणजे, दुकान असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; परंतु त्यामध्ये मेमरी कार्डच नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे संशयितांचे हालचाली टिपणारे फुटेजही पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाही.
बिनानंबरची कार आणि निष्प्रभ सीसीटीव्ही; तपासाचे धागेदोरे कुठे?
एकीकडे महामार्गालगतच्या व्यावसायिक संकुलात सीसीटीव्ही यंत्रणा असूनही त्यात मेमरी कार्ड नसणे, तर दुसरीकडे संशयितांनी वापरलेल्या वाहनाला नंबर प्लेटच नसणे, या दोन बाबींमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भरदिवसा सराफाच्या दुकानात शिरून बनावट नोटांच्या आधारे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांनीही व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान आता लोटे पोलिसांसमोर आहे.


