(रायगड / वृत्तसंस्था)
भाऊबीजेच्या सणाचा आनंद सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल परिसरावर शोककळा पसरली आहे. पेण तालुक्यातील खरोशी फाटा येथे टँकर आणि स्कूटर यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत चौल येथील लक्ष्मण भालचंद्र राणे यांचा मृत्यू झाला. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दादर सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण राणे हे आपल्या मेव्हण्यासोबत स्कूटर क्रमांक MH 43 BS 8979 वरून अलिबाग येथून वाशी, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, पेण तालुक्यातील खरोशी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर त्यांच्या स्कूटरची टँकर क्रमांक NL 01 AH 3653 याच्याशी धडक झाली.
या अपघातात लक्ष्मण भालचंद्र राणे गंभीर जखमी झाले. मात्र, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चौल परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दादर सागरी पोलीस पुढील तपास करत आहेत.


