(संगमेश्वर)
संगमेश्वरजवळील निढळेवाडी या छोट्याशा गावातील अवघी सहा वर्षांची चिमुकली श्रीशा अनुप पिंपरकर हिने चिन्मय मिशन मुंबई आयोजित “चिन्मय गीता फेस्ट २०२५” या प्रतिष्ठित स्पर्धेत अखिल मुंबई पातळीवर पहिले बक्षीस पटकावले असून, तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सध्या आयआयटी मुंबईतील शाळेत सिनिअर केजी मध्ये शिक्षण घेणारी श्रीशा, संस्कृत श्लोकांचे अस्खलित आणि अचूक उच्चारण करण्याच्या कौशल्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
नॅशनल चिन्मय गीता चॅन्टिंग कॉम्पिटिशनअंतर्गत आयोजित या स्पर्धेत श्रीशाने श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ – पुरुषोत्तम योग मधील सर्व श्लोक अत्यंत स्पष्ट, सराईत आणि भावपूर्ण रीतीने सादर केले.
तिने २१ ऑगस्ट २०२५ रोजी शालेय स्तरावर पहिले बक्षीस, २१ सप्टेंबर २०२५ रोजी क्षेत्रीय स्तरावर पहिले बक्षीस, आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अखिल मुंबई प्रदेशस्तरावर पहिले बक्षीस मिळवले. या शानदार यशानंतर श्रीशाची निवड २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
श्रीशाचे अचूक संस्कृत उच्चारण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण पाहून परीक्षक तसेच प्रेक्षकांनी तिच्या कौशल्याचे कौतुक केले. आयोजकांनीही तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

