( संगमेश्वर )
चिपळूण येथील खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) या विवाहितेला सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या दोन महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत अपेक्षा यांच्या आई सुनिता सखाराम गणवे (वय ६५, रा. कांदीवली, मुंबई, मूळ रा. शिवधामापूर, ता. संगमेश्वर) यांनी १६ ऑक्टोबर रोजी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, एप्रिल २०२५ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मयत विवाहितेवर सतत छळ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अमोल शंकर चव्हाण (वय ४८, पती), ६७ वर्षीय सासू, दिवा (ठाणे) येथील नणंद असा तिघांचा समावेश आहे. आरोपी क्रमांक १ आणि २ हे शिवधामापूर (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत अपेक्षा यांनी आपल्या आईकडून एका कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते. त्यापैकी काही दागिने पतीने गहाण ठेवले होते. दागिने सोडवण्यासाठी आईने पैसे दिले, तरीही आरोपींनी संगनमत करून दागिने व पैसे परत न करण्याबरोबरच, व्यवसायाकरिता माहेरहून आणखी पैसे आणण्याचा दबाव अपेक्षावर टाकला.
या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अपेक्षा यांनी २३ सप्टेंबर रोजी चिपळूण खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या तक्रारीच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेची नोंद १६ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली आहे.

