(चिपळूण)
चिपळूण शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे आधुनिक मलजल निस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.
या अभ्यास दौऱ्यात स्वच्छता व आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव तसेच शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारी १२.३० वाजता शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली. यावेळी सांडपाणी संकलन, प्रक्रिया, शुद्धीकरण आणि पुनर्वापर यासंबंधी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेण्यात आली. चिपळूण शहरात असा प्रकल्प राबविण्याची व्यवहार्यता, त्यासाठी लागणारी भौतिक सुविधा, तांत्रिक यंत्रणा आणि आर्थिक नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष उमेश सकपाळ, आरोग्य सभापती शुभम पिसे आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर सायंकाळी ४.०० वाजता नगराध्यक्षांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि कौशल्यविकास उपक्रमांची माहिती घेण्यात आली. विभागीय अधिकारी संदीप जाधव यांनी नगराध्यक्ष आणि शिष्टमंडळाचे स्वागत केले.
यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे संघटक विजय शिंदे, योगेश जाधव, सुयोग चव्हाण तसेच चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव आणि आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते उपस्थित होते.
या संपूर्ण अभ्यास दौऱ्याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, चिपळूण शहराची वाढती लोकसंख्या, स्वच्छतेशी संबंधित आव्हाने आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता आधुनिक मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प काळाची गरज आहे. यासंदर्भात लवकरच अधिकारी व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास चिपळूण शहराच्या स्वच्छतेला नवी दिशा मिळेल, पाणी पुनर्वापराला चालना मिळेल आणि पर्यावरणपूरक शहरनिर्मितीस मोठा हातभार लागेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

