(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा (५०४.३४ ग्रॅम) म्हणजेच संपूर्ण १०० टक्के मुद्देमाल रत्नागिरी शहर पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते याने अपहार केलेले दागिने विविध वित्तसंस्थांकडे तारण ठेवून ३५ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिते याने बँकेतील कॅशियर ओंकार कोळवणकर आणि शाखाधिकारी किरण बारये यांच्या संगनमताने नागरिकांनी तारण ठेवलेले दागिने बँकेच्या तिजोरीत जमा न करता परस्पर अपहार केले. हा प्रकार १८ फेब्रुवारी ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. या गैरव्यवहाराचा भांडाफोड ऑगस्ट महिन्यात झाला आणि २१ ऑगस्ट २०२५ रोजी तिन्ही संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ आणि पोलिस कॉन्स्टेबल सतीश राजरत्न यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून अखेर अपहारित दागिने शोधून काढले. या चौकशीत मोहितेने कबुली देताना सांगितले की, त्याने अपहार केलेले दागिने चिपळूण अर्बन बँक, मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स या संस्थांकडे तारण ठेवून कर्ज घेतले होते. यानंतर पोलिसांनी तिन्ही संस्थांना नोटिसा बजावून हे दागिने अपहारित असल्याचे कळविले.
चिपळूण अर्बन बँकेने तत्काळ आपल्याकडील दागिने पोलिसांकडे जमा केले. मात्र मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स यांनी दागिने परत करण्यास नकार देत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अखेरीस उच्च न्यायालयाने पोलिसांचा दावा मान्य ठरवत दोन्ही कंपन्यांना दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
तपासात असेही स्पष्ट झाले की, जिल्हा बँकेतून अपहारित दागिन्यांचे मूळ वजन ५७७.९४ ग्रॅम होते. मात्र कर्जप्रक्रियेदरम्यान २४ कॅरेट सोन्याच्या प्रमाणावर ५०४.३४ ग्रॅम वजन नोंदविण्यात आले होते. तक्रार दाखल करतानाही याच वजनाचा उल्लेख करण्यात आला होता. या कारवाईनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहारप्रकरणातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला असून तपासाचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे.

