(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथे घडलेल्या ७४ वर्षीय श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या सोबत अप्पर पोलिस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती शेटे या आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, तसेच लांजा–राजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक तज्ञ पथक, श्वानपथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) अधिकारी यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. प्राथमिक तपासानुसार, श्रीमती शेटे या एकट्याच राहात होत्या. सोमवारी त्या शेवटच्या वेळेस वाडीत दिसल्या होत्या. बुधवारी सकाळी शेजारील महिलेला त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने संशय आला. दरवाजा उघडून पाहिले असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या.
घटनास्थळी उपस्थित झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तपास पथकाकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्याच्या काटेकोर सूचना दिल्या. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील वातावरण शांत राहावे, यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिस अधीक्षकांच्या तात्काळ उपस्थितीमुळे तपासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

